नागपूर - स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अनेक भागात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, विकासकामांच्या नावाखाली सामान्य नागरिकांचे भूखंड हस्तांतरित केले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. महानगरपालिकेच्या या धोरणांविरोधात शिवसेनेने आंदोलन पुकारले आहे.
शहरातील भरतवाडा, पुनापूर, पारदी व भांडेवाडी या भागातील पीडित जनतेला योग्य न्याय मिळावा तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांचे धोरण बदलावे, अधिकाऱ्यांची जनतेवरील दडपशाही बंद करावी, अशी मागणी या वेळी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाने प्रभावित झालेल्या लोकांना योग्य मोबदला द्यावा. तसेच नागपूर सुधार प्रन्यास मंजूर नियमित भूखंडांपासून मुक्त करणारे स्मार्ट सिटी आरक्षण तयार करण्यात यावे, अशा मागण्या करत शिवसेना आक्रमक झाली आहे. हे आंदोलन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आले.