नागपूर - 'सामना' वाचण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षात यावे लागले, जर सत्तेत असताना त्यांनी सामना वाचला असता, तर त्यांचे सरकार वाचले असते, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सामना पेपरमधील लेख दर्शवणारे फलक घेऊन आज विधानभवनात भाजपने घोषणाबाजी केली. यासंदर्भात राऊत यांनी सामनावरून फडणवीसांना टोला लगावला.
हेही वाचा - आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत, आम्ही धर्मांतर केलेले नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राम मंदिराविषयी बोलताना ते म्हणाले, राम मंदिराचा कळस आता आकाशाला टेकलेला तुम्हाला दिसेल, मात्र त्याचा पाया शिवसेनेने घातला आहे. त्यासाठी कारसेवकांनी, शिवसैनिकांनी, विश्व हिंदू परिषद, साधू-संत आणि भाजपच्याही कार्यकर्त्यांनी कष्ट केले आहेत. त्याचे श्रेय कोणा एकट्याला घेता येणार नाही.
सध्या नागरिकत्व विधेयकावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलन आणि जाळपोळी विषयी राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले, ज्या देशात विद्यार्थ्यांवर लाठीमार व गोळीबार होतो, त्या देशात लोकशाही ही धोक्यात आहे असे समजावे.