नागपूर - कोरोना रुग्ण बरे होण्याची देशात सर्वाधिक टक्केवारी असलेल्या नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे चार मोठ्या कंटेनमेंट झोनमधील सात परिसरात कोरोनामुक्त झालेले आहेत. याबाबत नागपूर महानगरपालिकेने घोषणा केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळत असल्याचे दिसत आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असताना उपराजधानीत मात्र कोरोनाची पीछेहाट झाल्याचे बघायला मिळत आहे. नागपूर महानगरपालिकेने सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरासह चार मोठ्या कंटेनमेंट झोनमधील सात परिसर कोरोना मुक्त करण्यात यश मिळवले आहे. गेल्या दीड महिन्यात संपूर्ण सतरंजीपुरा परिसरातून कोरोनाचे दीडशे रुग्ण पुढे आले होते. म्हणून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. त्या ठिकाणी एसआरपीएफ जवानांनाही तैनात करण्यात आले होते.
या परिसरात मनपा प्रशासनाने कोरोना रुग्णांचा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार केले. पॉझिटिव्ह रुग्णांचा संपर्कात येणाऱ्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेऊन त्यांची वेळोवेळी तपासणी करण्यात आली. कंटेनमेंट झोन घोषित केल्यानंतर त्या भागातील कोणत्याही नागरिकांना बाहेरील नागरिकांच्या संपर्कात येऊ दिले नाही. यामुळेच सतरंजीपुरासह चार मोठ्या कंटेन्मेंट झोनमधील सात परिसर कोरोनामुक्त झाले.
सात परिसरांमध्ये सतरंजीपुरा येथील लालगंज, दलालपुरा, शांतिनगर, गौतम नगर, आसिनगर झोनमधील राजीव गांधी नगर, कुन्दनलाल गुप्ता नगर आणि गांधीबाग झोनमधील भालदारपुरा या परिसरांचा समावेश आहे. हे परिसर कोरोनामुक्त झाल्याने येथील जनजीवन पूर्वपदावर येणार आहे. तसेच येथील पोलिसांचा बंदोबस्त देखील हटवला जाणार आहे.