नागपूर - महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे मनमानी पद्धतीने महानगरपालिकेचा कारभार चालवत आहेत. ते लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत सत्ताधारी आणि विरोधक तुकाराम मुंढे यांच्या विरोधात एकवटले आहेत. मुंढे यांच्या विरुद्ध महानगरपालिका सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इशाराही सत्ताधारी आणि विरोधकांनी दिला आहे.
नागपुरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळत असताना महानगरपालिकेचे तुकाराम मुंढे यांच्या कामाची प्रशंसा होत आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेत स्थानिक राजकारण देखील सुरू झाले आहे. आत्तापर्यंत तुकाराम मुंढे विरुद्ध सत्ताधारी गट असा सामना रंगताना दिसत होता. आता मात्र, तुकाराम मुंढे विरुद्ध ऑल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एरवी एकमेकांच्या विरोधात असलेले महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेच्या विरोधात एकत्र आल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले. तुकाराम मुंढे हे मनमानी पद्धतीने महानगरपालिकेचा कारभार चालवत असून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नागपूरात सत्ताधारी व विरोधकांनी पहिल्यांदाच संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंढे हे हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत असल्याची टीका केली. मार्च महिन्यापासून सुरू झालेले कोरोना नामक संकट आता अडीच महिन्याचे झाले आहे. अशा परिस्थितीत महापालिका आयुक्त मुंढे यांनी शहराविषयी निर्णय घेताना महापौरांपासून ते सामान्य नगरसेवकांनाही विश्वासात घेतले नाही.
क्वारंटाईन सेंटरच्या गैरसोयींबद्दल अनेक तक्रारी येत आहेत. पण त्या तक्रारी दूर करण्यात आयुक्त अपयशी ठरले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्याविषयी आयुक्त काहीही करत नाहीत, उलट नागरिकांच्या समस्या घेऊन आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्यात येतात. जर अशीच परिस्थिती राहिली तर महापालिकेच्या सभागृहात त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणावा लागेल, असा इशारा महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वणवे यांनी दिला. काँग्रेसने मुंढे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यास सत्ताधारी भाजप त्याचे समर्थन करेल, असे सत्ताधारी पक्ष नेते संदीप जाधव म्हणाले.