नागपूर - कोणीही कायदा हातात घ्यायला नको आणि तो अधिकार कोणालाही नाही. दिल्लीमध्ये अशांती पसरली आहे. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे आणि आवश्यक असेल तिथे कारवाई करावी, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी म्हणाले. माधव नेत्रालया येथे 'श्री महारुद्र अभिषेक स्वाहाकार यज्ञ' कार्यक्रम पार पडला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
माधव नेत्रालयाबद्दल बोलतना ते म्हणाले, याठिकाणी भारतमाता यज्ञ झाले होते. तसेच, हे नेत्रालय उभारण्याआधी अनेक समस्या आल्या. त्यामुळे तेथेही असेच यज्ञ करण्यात आले. दोन्ही यज्ञ म्हणजे योगायोग असल्याचे भैय्याजी जोशी म्हणाले. यावेळी स्वामी सवितानंद महाराज आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष दिगंबर उपस्थित होते.
काय आहे दिल्ली हिंसाचार प्रकरण? -
सीएए समर्थक आणि विरोधकांचे दोन गट २३ फेब्रुवारीला आमनेसामने आले होते. यावेळी जाळपोळ, दगडफेक करण्यात आली. या हिंसाचारामध्ये मृतांचा आकडा वाढून ३८ झाला आहे. पोलीस आणि निमलष्करी दलाकडून हिंसाग्रस्त परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. तीन दिवस चाललेल्या हिंसाचारात २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ईशान्य दिल्लीतील अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.