नागपूर - राफेल लढाऊ विमान भारतात दाखल झाले आहे. त्यामुळे भारतीय वायूसेनेची ताकद वाढणार असून शत्रू राष्ट्रांच्या मनात धडकी भरवण्यासाठी हे पुरेसे असेल, असे मत भारतीय वायूसेनेचे निवृत्त एअर वाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी व्यक्त केले आहे.
राफेल हे विमान मल्टीरोल एअर फायटर विमान आहे. हवेतून हवेत, हवेतून जमिनावर हल्ला करण्यासोबतच जमिनीवरून सुद्धा हे विमान शत्रूंवर हल्ला करण्यास सक्षम आहे. भारताने राफेल विमानांसोबतच घातक शस्त्र आणि मिसाईल खरेदी केल्याने या विमानाची मारक क्षमता अफाट झाल्याचे देखील ते म्हणाले आहेत. शिवाय वैमानिकांचे प्रशिक्षणसुद्धा फ्रांसमध्ये झाले आहे. त्यामुळे त्रिकूट जमून आल्याचे त्यांनी सांगितले आहे. विमान खरेदी प्रक्रियेवरून झालेला वाद योग्य नाही. विमानांची गरज भासते त्यावेळी ती खरेदी प्रक्रिया सुरू केली जाते. पुढील काही वर्ष त्याला लागतात. त्यामुळे वायूसेनेचे अपग्रेडेशन करताना भविष्याचा विचार करणे गरजेचे असल्याचेदेखील चाफेकर म्हणाले.
भविष्यात भारतीय लष्कराचे हात मजबूत करण्यासाठी सर्वच पक्षांनी राजकारण सोडून एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही चाफेकर म्हणाले.
कसे आहे राफेल? -
राफेल लढाऊ विमानांमध्ये एसएनईसीएमए मधील 2 एम 88-2 इंजिने आहेत. प्रत्येक इंजिन हे 75 केएन थ्रस्टचे आहे. तसेच राफेल लढाऊ विमाने ही हवेत इंधन भरू शकतात. ही विमाने एकमेकांना इंधने भरण्यास मदत करू शकतात. राफेल हे 100 किलोमीटर लांब असलेले शत्रूचे विमान भेदू शकते. तसेच राफेल एकावेळी 8 लक्ष्य साध्य करू शकते.