नागपूर - मध्य भारतातील सर्वात महत्वाचे शहर म्हणून नागपूरचा उल्लेख होतो. नागपुरात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. वर्षभरात ९० पेक्षा जास्त खुनाच्या घटना घडल्यामुळे नागपुरातील गुन्हेगारांना कायद्याची भीती आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. खुनाच्या घटनांमध्ये हल्ली अग्नी शस्त्रांचा (बंदूक) वापर वाढत आहे. त्याच बरोबर अनेक ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर सुद्धा चाकू सहज उपलब्ध होत आहे. गुन्हेगार त्याचा देखील वापर करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे नागपुरात शस्त्रांची ऑनलाइन विक्री करता येणार नाही.
ऑनलाइन विक्री केल्या जाणाऱ्या धारदार शस्त्रांचा वापर करून गुन्हेगार नागपुरात गंभीर गुन्हे घडवत असल्याचे समोर आले. नागपूर पोलिसांनी ऑनलाइन पोर्टलवरील धारदार शस्त्रांच्या विक्रीवर अनेक निर्बंध घातले आहे. नऊ इंचापेक्षा जास्त लांबीच्या आणि दोन इंचापेक्षा जास्त रुंदीचे चाकू आणि खंजीरची विक्री नागपूरच्या ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने करता येणार नसल्याचे नागपूर पोलिसांनी जाहीर केले आहे. ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांना त्याची सूचनाही देण्यात आली आहे. त्यापेक्षा लहान आकाराच्या शस्त्रांची विक्री करताना खरेदीदारांची संपूर्ण माहिती विक्री करणाऱ्या कंपन्यांनी ठेवावी आणि ती पोलिसांना द्यावी, असे बंधनकारक करण्यात आले आहे.
अनेक घटनांमध्ये ऑनलाइन मागवलेल्या शस्त्रांचा झाला वापर -
नागपुरात ३० सप्टेंबर रोजी बोले पेट्रोल पंप चौकात घडलेल्या हत्या प्रकरणात व १७ नोव्हेंबर रोजी यशोधरानगर परिसरात घडलेल्या हत्या प्रकरणात आरोपींनी ऑनलाइन पद्धतीने खरेदी केलेले चाकू आणि इतर हत्यारे वापरली होती. ऑनलाइन शस्त्रांची विक्री कायदा सुव्यवस्थेसाठी घातक असल्याचे समोर आल्यानंतर नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी त्यासंदर्भात कठोर पावले उचलली. त्यांनी शस्त्रांच्या ऑनलाइन विक्रीवर निर्बंध घातले आहेत.
ऑनलाइन शस्त्र मागावणाऱ्यांची यादी वाढत आहे -
विशेष म्हणजे एका ऑनलाइन पोर्टलवरून गेल्या काही महिन्यात नागपुरातील १२२ जणांनी धारदार शस्त्रे विकत घेतल्याचे समोर आले आहे. या १२२ जणांपैकी ३० जणांचे गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याने त्या सर्वांनी धारदार शस्त्रे कोणत्या उद्दिष्टाने खरेदी केली होती, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.