नागपूर: आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सहसंघटक श्रीधर गाडगे यांच्याहस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. तसेच रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरातील डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रख्यात फिजिशियन डॉ. सुशील मानधनिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अनेक कार्यक्रमाचे आयोजन : भारतात २६ जानेवारी या दिवसाला खास महत्त्व आहे. हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिवस. या दिवशी नवी दिल्लीत डोळे दपून जावेत अशी परेड पाहायला मिळते. संपूर्ण जगाला भारताची काय ताकद आहे हे दिसते. याबरोबरच देशभरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशातील नागरिक वेगवेगळ्या प्रकारे आपली देशभक्ती व्यक्त करतात. या दिवसाला भारतात विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी भारत पूर्णपणे स्वातंत्र झाला होता. मात्र, अनेकांना या दिवसाचे महत्त्व नक्की काया आहे हे विस्ताराने माहिती नाही.
भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी : २६ नोव्हेंबर १९४९ आणि २६ जानेवारी १९५० हे दोन दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. त्यानंतर दोनच महिन्यांत म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. या घटनांची आठवण म्हणून देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास हा अत्यंत खडतर होता.
२६ जानेवारीपासून भारताचे लोकशाही पर्व : स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आले. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारताचे लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झाले. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.