नागपूर - बहुप्रतिक्षीत असणारी नागपूरची 'माझी मेट्रो' धावण्यासाठी सज्ज झाली आहे. संशोधन डिझाईन आणि मानक संघटना म्हणजेच आरडीएसओचे पथक येत्या १६ फेब्रुवारीला नागपूर मेट्रोच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी येणार आहे. त्यासाठी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी बुलंद शर्टींग इंजिनद्वारे रुळाची पहाणी केलेली आहे.
महामेट्रोतर्फे 'रिच वन' म्हणजेच खापरी रेल्वे स्टेशन ते मुंजे चौक येथे इंटरचेंज होणाऱ्या बर्डी मेट्रो स्टेशन या १३ किलोमीटरच्या दरम्यानचे काम प्रचंड वेगाने पूर्ण केले जात आहे. पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. एलिव्हेटेड रूट चे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळेच मेट्रो प्रशासनाने मेट्रो रेल्वे सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केलेले आहेत.
बुधवारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रूजेश दीक्षित यांनी बुलंद शर्टींग इंजिनच्या मदतीने रुळांची पाहणी केली होती. त्यानंतर आज महामेट्रोचे ट्रायल रन करण्यात आले. आता शनिवारी आरडीएसओचे पथक निरीक्षण करेल. त्यानंतर २२ आणि २३ फेब्रुवारीला सिएमआरएस म्हणजेच कमिशन ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी कडूनही प्रकल्पाची पाहणी केली जाणार आहे.