नागपूर - बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भातील नागपूरसह इतरही जिल्ह्यांत येत्या ४८ तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय उद्यापासून वातावरणात बदल देखील होणार असल्याची माहिती नागपूर हवामान विभागाने दिली आहे. तसेच हवामान बदलामुळे थंडीचा पारादेखील कमी होईल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता-
नुकतेच विदर्भात परतीच्या पावसाने प्रचंड मोठे नुकसान केले होते. त्यानंतर आता पुन्हा विदर्भातील नागपूरसह इतरही जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे त्याचा परिणाम तामिळनाडूवर होणार आहे. त्यामुळे त्याची झळ मराठासह विदर्भाला बसण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा यासह इतरही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. शिवाय उद्यापासून ढगाळ वातावरण होऊन तापमान वाढेल. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यताही नागपूर हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांनी म्हटले आहे. अशावेळी वातावरण होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच पावसामुळे कापसासह इतरही पिकांना धोका आहे. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे नुकसान होऊ नये म्हणून हवामान विभागाकडूनही वेळोवेळी सूचीत करण्यात येत आहे.