नागपूर - येथील पूर्व नागपूर मतदारसंघाची परिस्थिती भारतीय जनता पक्षासाठी फेवरेबल दिसत आहे. पूर्व नागपूर मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होताना बघायला मिळत आहे. सलग दोन वेळा आमदार असलेले कृष्णा खोपडे यांच्या विरुद्ध काँग्रेसने नवखे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.
हेही वाचा- नाना पटोलेंच्या मतदारसंघात मोदींची सभा; लोक म्हणतात...
नागपूर शहरातील पूर्व नागपूर हा विधानसभा मतदारसंघ कधी-काळी मागासलेला भाग म्हणून ओळखला जात होता. गेल्या 5 वर्षाच्या काळात या भागातील नागरिकांनी विकासाची चव चाखली आहे. मात्र, ही चव इथल्या नागरिकांना कधी गोड वाटली होती. परंतु, रेंगाळणारे विकास कामे आता नागरिकांना नको-नकोसे वाटू लागली आहेत. गेल्या पाच वर्षात पूर्व नागपूरच्या विठोडा भागात सिम्बॉयसिस कॉलेज, स्पोर्स्ट्स कॉम्प्लेक्स, मेट्रो आणि स्मार्ट सिटी प्रोजेक्टसह अनेक विकासकामे केल्याचा दावा विद्यमान आमदार कृष्णा खोपडे करत आहेत. हेच मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जात आहेत. तर भाजपने केलेला हा दावा म्हणजे विकास नसून पूर्व नागपूरला भकास करण्याचा प्रयत्न आहे,असा आरोप काँग्रेस उमेदवार पुरुषोत्तम हजारे करत आहेत. हजारे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे समर्थन असल्याने सामन्यात थोडी रंगात आल्याचे बघायला मिळत आहे.