नागपूर- राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहुल लागली आहे. काही दिवसातच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्ष युत्या-आघाड्यांमध्ये गुंतले आहेत. लोकसभेत आपली ताकद दाखविल्यानंतर वंचित आघाडीने यात सरशी घेतल्याचे दिसत आहे. प्रकाश आंबेडकर आज नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचक विधान केले आहे.
- काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
- तिसऱ्या आघाडी संदर्भात आम्ही निश्चित आहोत, मात्र उरलेले लोकं निश्चित नाही असे म्हणावे लागेल. अनेक लोकं वेगवेगळे विधाने करत आहे. त्यामुळे कोण आमच्या सोबत येईल आणि कोण येणार नाही, हे सांगणे घाईचे होईल. असे मी म्हणेन. दोन गट आमच्या बरोबर पक्के आहेत. सीपीएम मधला एक गट आणि सत्यधोधक कम्युनिस्ट पार्टी आमच्या सोबत आहे. इतरांसोबत चर्चा सुरू आहे. 10 ऑगस्ट पर्यंत आघाडी चे चित्र स्पष्ट होईल. 15 ऑगस्ट नंतर आमचे उमेदवार जाहीर करणे सुरू करू. तेव्हाच आम्ही आमची रणनीती जाहीर करू.
- काँग्रेसचे राज्यातलं नेतृत्व वेगळे बोलते आणि केंद्रातले नेतृत वेगळे बोलते. दुर्दैवाने काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्याचे नेतृत्व कुटुंबवादी आहे. त्यांची आघाडी कुटुंबशाहीची आघाडी आहे. त्यांच्या याच कुटुंबशाहीच्या राजकारणामुळे मागील निवडणुकीत त्यांना अपयश आले. काँग्रेस कडून ऑफर आली आहे, पत्रव्यवहारही झाला आहे. आम्ही त्यांच्या उत्तराची वाटपाहतोय. आयडियलॉजीचं राजकारण कमी झाले आहे. अनेक दिवस एका पक्षात राहून आपल्याला स्थान मिळत नाही हे पाहून अनेक जण बाहेर पडत आहेत. आणि हे फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत होत नाहीये, तर भाजप सेने मध्ये ही तेच होतंय.
- निवडणुकांसाठी आम्हाला यात्रा काढायची गरज नाही. आम्ही लोकसभेच्या वेळेतच जमिनीची मशागत करून ठेवली आहे.
- आम्हाला कुठल्याही यात्रेची गरज नाही, लोकसभा निवडणुकीत आम्ही जमीन भुसभुशीत केली, निवडणुकीनंतर छाटणी करू.
असे विधान प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.