नागपूर - शहरातील चौकांमध्ये चक्क तडीपार गुंडांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि पोलिसांना जनसामान्यांची मदत व्हावी, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम नागपूर गुन्हे शाखेकडून राबवला जात आहे.
गुन्हे करून तडीपार असलेले गुन्हेगार अनेकदा रात्री अथवा दिवासाढवळ्या शहरात येऊन उपद्रव करत असतात. त्यामुळे तडीपार गुंड कुठे लपून बसल्यास याची माहिती पोलीसांना कळावी, यासाठी पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे.
मनाकपूर पोलीस ठण्यांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अशाच प्रकारे शहरात 50 तडीपार गुंडांचे पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. गुंड आणि त्यांच्या गुन्हेगारी बद्दल लोक गाफील राहू नयेत, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर ज्या गुंडांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत, त्या गुंडाची फोनद्वारे माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.