नागपूर - गुन्हे शाखा पोलिसांनी शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अत्रे लेआऊट परिसराच्या आनंद नगर येथील एका बंगल्यात छापा टाकला. यावेळी आठ जुगरींना ताब्यात घेण्यात आले. यासोबतच घर मालक संजय लाटकर यांना देखील ताब्यात घेतले असून यामध्ये भाजपचे नगरसेवक प्रवीण भिसीकरसह एका डॉक्टराचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात समाजाला ज्या वर्गाकडून मोठी अपेक्षा आहे, त्यापैकीच काही लोक नियमबाह्य कामे करत कायदा पायदळी तुडवत असल्याचे उघड झाले.
आनंदनगर भागात एका बंगल्यात अनेक लोक जमा होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने आनंदनगर भागात त्या बंगल्यावर छापा टाकला. त्याठिकाणी अनेकजण जुगार खेळताना आढळले आहेत. सुरुवातीला या सर्वांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी चहूबाजूने कोंडी केल्याने पळून जाण्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या या बड्या मंडळीला ताब्यात घेतले आहे. जुगारींनी कारवाई टाळण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी त्यांची कारवाई पूर्ण केली आहे. पोलिसांनी जुगार सुरू असलेल्या ठिकाणाहून हजारो रुपयांची रोकड, दहा मोबाईल, तीन कार, दोन बाईक्स याच्यासह एकूण १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.