नागपूर - कोरोनापासून मुक्त झालेल्या व्यक्तीवर नागपूरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नाही, तर या व्यक्तीला पोलिसांनी क्वारंनटाईनदेखील केले आहे. नागपूरच्या मोमीनपुरा परिसरातील या व्यक्तीला कोरोना झाल्याचे 4 एप्रिलला समोर आले होते. टेलरचा व्यवसाय करणारी ही व्यक्ती दिल्लीहून परत आली होती. व्यवसायानिमित्त दिल्लीला गेल्याचे त्याचे म्हणणे होते.
कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यावर त्याच्यावर गेल्या 14 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान नियमानुसार केलेल्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यावर शुक्रवारी रात्री त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सुट्टी मिळाल्यावर त्याला घरीच विलगीकरणात राहण्याची सूचना देण्यात आली होती. परंतु, रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर ही व्यक्ती परिसरात भटकत असल्याचे निदर्शनात आले.
सोबतच सोशल मीडियावर उलट - सुलट व्हिडीओ व संदेश प्रसारित करू लागला. याप्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिसांनी त्याच्यावर कलम 188, 270 व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीला पोलिसांनी 14 दिवसांसाठी क्वारांटाईन केले आहे.