नागपूर : उमरेड कऱ्हांडला जंगलाच्या जवळ असलेल्या एका खासगी रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली. या रिसॉर्टमध्ये आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्या सहा नृत्यांगनासह बारा बड्या लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. टायगर पॅराडाईज रिसॉर्ट असे पोलिसांनी छापेमारी केलेल्या रिसॉर्टचे नाव असून हे रिसॉर्ट उमरेड कऱ्हांडला अभयारण्याला लागून आहे. व्याघ्र प्रकल्प जंगलालगत टायगर पॅराडाईज रिसॉर्टमध्ये हाय प्रोफाईल पार्टी सुरू असल्याची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली.
डीजेच्या तालावर थिरकत होत्या नृत्यांगना : छापेमारीच्या कारवाईदरम्यान विद्युत रोषणाईच्या झगमगाटामध्ये, डीजेच्या तालावर नृत्यांगना थिरकत होत्या. येथे उपस्थिती बड्या हस्तींच्या जवळ दारूच्या बॉटल्स होत्या. नृत्यांगणांवर हवेत पैसे उडवून डान्स हंगामा सुरू होता. रिसॉर्टमधील एका बंद हॉलमध्ये हा धिंगाणा सुरू होता.
अनेक बड्या व्यक्ती ताब्यात : पोलिसांनी कारवाई करत सहा नृत्यांगनासह बारा पुरुष असे एकूण 18 जणांवर कारवाई केली. यात रिसॉर्टच्या मॅनेजरचाही समावेश आहे. या कारवाईमध्ये नागपूर, भंडारा, मौदा, उमरेड येथील अनेक नामवंत व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांचा सुगावा लागताच उडाली तारांबळ : व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारीच हा धिंगाणा सुरू असल्याने प्राण्यांच्या वर्दळीवर या धिंगाण्याचा परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात येत. त्यामुळेच याबाबतची माहिती तेथील खबऱ्याने नागपूर ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी रिसॉर्टवरछापेमारी करताच परिसरातील अनेक बड्या हस्ती येथे नृत्यांगणांवर नोटा उधळत असल्याचे उघड झाले. मात्र पोलिसांनी छापेमारी करताना या बड्या हस्तींची चांगलीच तारांबळ उडाली.
सूचना पत्रावर सोडण्यात आले : पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांची चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर, कागदपात्रांची पूर्तता आणि पूर्ण चौकशी करून सर्व आरोपींना सूचना पत्रावर सोडण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी डीजे, स्मोक मशीन विदेशी मद्यासह एकूण पावणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा -