नागपूर: अकोला जिल्ह्यातील खारपानपट्ट्यात सुरू असलेली पाणीपुरवठा योजनेच्या कामाला राज्य सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो लोकांसह निघालेली संघर्ष यात्रा बुधवारी रात्रीच नागपुरात दाखल झाली होती. आज संघर्ष यात्रा राज्याचे गृहमंत्री आणि अकोला जिल्हाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी धडकणार होती. मात्र, पोलिसांनी संघर्ष यात्रा वडधामण येथे दाखल झाल्यानंतर आमदार नितीन देशमुख यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
ग्रामस्थ हे गोड्या पाण्यापासून वंचित: पाणीपुरवठा योजनेत १५० कोटी रुपये खर्च झाले असून ८० टक्के कामही पूर्ण होते. मात्र, पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक आमदारांच्या सांगण्यावरून योजना स्थगित केली. त्यामुळे खारपानपट्ट्यातील ६९ गावांमधील ग्रामस्थ हे गोड्या पाण्यापासून वंचित झाले आहेत. त्यामुळे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ६९ गावातील लोकांनी संघर्ष यात्रा काढली आहे. तसेच सत्ता संघर्षाच्या वेळी एकनाथ शिंदें यांच्या सोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदार नितीन देशमुख परत आले होते. त्यावेळी नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. तिथूनच नितीन देशमुख हे चर्चेत आले होते.
वज्रमुठ सभेत फडणवीसांवर हल्लाबोल: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा वाटले की, विदर्भाचा विकास होईल असे वाटत होते. मी उद्धव ठाकरे सोबत असल्याने माझ्यावर पाच गुन्हे दाखल केले. माझ्यावर अश्लील चाळे केल्याचे गुन्हे दाखल केले. खरपट्टी पाणी योजनेवर 150 कोटी खर्च झाल्यानंतर योजनेला स्थगिती दिली. म्हणून पाचशे लोक लोट-लोट पाणी घेऊन देवेंद्र फडणवीस यांना पाणी पाजण्यासाठी निघाले होते. वज्रमुठ सभेत नितीन देशमुख भलतेच तावात आले होते. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे मतिमंद प्रदेशाध्यक्ष आहेत असा वक्तव्य केले होते. मतिमंद आहेत म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्ष केले असेल असे देखील ते म्हणाले होते.