नागपूर- अजनी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पेट्रोलिंग दरम्यान दीड लाखांच्या दारूसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी पळून गेलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वर्धा येथे राहणार जुनेद शेख करीम शेख आणि संजय उरफा लाला बारहाते यांचा समावेश आहे.
अजनी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती समजली होती की, एका कारमधून दारूची तस्करी केली जाणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी छत्रपती चौक श्रीनगर परिसरात पेट्रोलिंग सुरू केली होती. पोलिसांना ज्या गाडीची माहिती समजली होती ती गाडी येताना पोलिसांच्या पेट्रोलिंग पार्टीला दिसताच त्यांनी गाडीला थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना बघताच आरोपींनी गाडी पळवण्यास सुरुवात केल्याने पोलिसांना देखील नाईलाजास्तव त्यांचा पाठलाग सुरू करावा लागला. पोलीस आपल्या मागावर येत असल्याचे समजताच आरोपींनी मानेवाडा मार्गावरील सिंग्नलवर गाडी सोडून पळ काढला होता. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांची दारू आढळून आली होती. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता पोलिसांनी जुनेद शेख करीम शेख नावाच्या आरोपीला वर्धा जिल्ह्यातून ताब्यात घेतले, तर दुसरा आरोपी हा नागपुरातच आढळून आला आहे. पोलिसांनी दीड लाखांच्या दारूसह आरोपींची गाडी असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.