नागपूर - गुजरात येथील उद्योगपतीला बंदुकीचा धाक दाखवून एक कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी संतोष आंबेकर या गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयात घेऊन जाताना पोलिसांनी त्याची आकाशवाणी चौक ते जिल्हा सत्र न्यायालयापर्यंत धिंड काढली. महागड्या गाड्यांमध्ये फिरणारा हा गुन्हेगार टी-शर्ट आणि हाफ पॅन्टवर तो ही अनवाणी पायाने पोलिसांच्या गराड्यात जाताना बघून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढल्याची चर्चा परिसरात होती.
हेही वाचा - धुळ्यात शिरपूर येथून पोलिसांनी जप्त केली ५ लाखांची रोख रक्कम
आरोपी संतोष आंबेकर याने गुजरातमधील उद्योजक जिगर पटेल यांना जमिनीच्या व्यवहारात फसवून त्यांच्याकडून ५ कोटी रुपये घेतल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे दाखल झाली आहे. एवढेच नाही तर आंबेकरने रक्कम हडपल्यानंतर त्याच उद्योगपतील पुन्हा पिस्तुलाच्या धाकावर एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या संदर्भात शनिवारी पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर रविवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करताना पोलिसांनी आकाशवाणी चौक ते न्यायालयापर्यंत त्याची पायी वरात काढली. या प्रकरणातील फिर्यादी जिगर पटेल हे मुंबईत एका जागेच्या शोधात असताना आंबेकरने त्यांना एक जागा दाखवली, ती पटेल यांना पसंत पडल्यानंतर त्यांनी संतोषला टोकन म्हणून 5 कोटी रुपये दिले होते. हा व्यवहार झाल्यानंतर संतोष जिगर पटेल यांना प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी जमिनीची कागदपत्रे तपासली असता कागदपत्रे खोटी असल्याचे समजल्यानंतर पटेल यांनी संतोषला नागपुरात भेटण्यासाठी बोलावले. यावेळी संतोषने त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पुन्हा एक कोटी रुपयांची खंडणी वसूल केली. या सर्व घटनाक्रमानंतर जिगर पटेल यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी संतोषला अटक केली.
हेही वाचा - जामिनावर सुटून ३० घरफोडी करणारा 'मॉडेल' पोलिसांच्या जाळ्यात