नागपूर - राज्यातील कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही. त्यातच राज्य शासनाने सोमवारपासून ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने विचारपूर्वक घ्यावा. कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे इतर राज्यांतील उदाहरणे लक्षात घेऊनच हा निर्णय शासनाने घ्यावा, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते सध्या पदवीधर निवडणूकीच्या अनुशगांने नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील शाळा सुरू करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे हा निर्णय अद्याप संबंधित जिल्ह्यांना बंधनकारक करण्यात आलेला नाही. मात्र, काही जिल्ह्यात सोमवारपासून ९ ते १२ वी पर्यंत शाळा सुरू होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय हा विचारपूर्वक घेण्यात यावा, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
आरटीपीसी चाचणी खर्च शिक्षकांवर लादू नका-
फडणवीस पुढे म्हणाले, वाढत्या कोरोनामुळे काही राज्यात शाळा सुरू केलेल्या शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. तसेच राज्यात कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात आता शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, सरकारने इतर राज्यातील काही घटनांचा विचार लक्षात घ्यायला हवा, शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या केल्या जाणाऱ्या आरटीपीसी चाचण्यांचा खर्च हे शासनाने करावे. तो खर्च शिक्षकांवर लादू नये, असेही आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
कोरोनाने डोके काढले वर-
महाराष्ट्राचा विचार करता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत राज्यात कोरोना नियंत्रणात आला होता. 24 हजाराहून 20 हजार, 15 हजार, 10 हजार, 5 हजार आणि मग अडीच हजारावर कोरोना रुग्णांचा आकडा आला होता. मुंबईसारख्या कोरोनाच्या हॉटस्पॉटमधे ही 400 ते 600 रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आल्याचे दिलासादायक चित्र होते. पण आता हा दिलासा तात्पुरता ठरला आहे. कारण मागील चार-पाच दिवसांपासून पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊ लागली आहे.