नागपूर - विदर्भाला समृद्धीची वाट दाखवणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणार तरी कधी?, या एका प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राच्या सुजान जनतेला हवे आहे. दर पंधरा दिवसांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची नवीन तारीख पे तारीख जाहीर केली जाते. याला आता जनता कंटाळली आहे. गेल्या दोन वर्षात समृद्धी महामार्ग उद्घाटनाची किमान 10 वेळा तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र, एकदाची उद्घाटनाचा मुहूर्त साधण्यात आजी-माजी राज्य सरकारांना यश मिळाले नाही.
समृद्धीचे उद्घाटन नोव्हेंबर ऐवजी आता जानेवारी महिन्यात - विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊ शकण्याची क्षमता असणारा समृद्धी महामार्ग अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन वर्षात 'समृद्धी एक्सप्रेस- वे' च्या उद्घाटनाचा अनेकवेळा मुहूर्त ठरला. मात्र, उद्घाटनाचे योग जुळून आले नाहीत. आता-तर लोकांना देखील समृद्धी महामार्ग उदघाटनाची तारीख पे तारीख ऐकून अक्षरशः कंटाळाचे आला आहे. गेल्याचे महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते की समृद्धीचे उद्घाटन नोव्हेंबर महिन्यात होईल, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील समृद्धीच्या उद्घाटनाला नोव्हेंबरचा मुहूर्त निघाला असल्याचे सांगितले होते. मात्र, आता पून्हा नवीन डेडलाईन समोर आली आहे. समृद्धीचे उद्घाटन नोव्हेंबर ऐवजी आता जानेवारी महिन्यात करण्याचा बेत असल्याची नवीन तारीख जाहीर झाल्याने तारीख पे तारीख वाला खेळ कधी संपणार हा प्रश्न जनतेला पडलेला आहे.
तारीख पे तारीख, पण किती वेळा - समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्याची पहिली तारीख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. सुरुवातीला नागपूर ते शेलू बाजार, वाशिम असा २१० किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन १ मे २०२० ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, तो मुहूर्त हुकला. त्यामुळे नवा मुहूर्त म्हणून १५ ऑगस्ट ही डेडलाईन ठरवण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२१, ३१ डिसेंबर २०२१,३१ मार्च २०२२ तारीख देण्यात आली होती. मावळत्या सरकारने यावर्षी मे आणि नंतर जून महिन्यात मुहूर्त ठरवला होता. मात्र, त्यानंतर राज्यात सत्ता नाट्य घडल्याने सत्तांतर घडले त्यामुळे उद्घाटन पुन्हा मागे पडले. आता नवीन सरकारने यावर्षी नोव्हेंबरमध्ये उद्घाटनाचा बार उडवू अशी घोषणा केली होती. मात्र, ती सुद्धा हवेत वीरल्यामुळे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला पुढील वर्ष उजडणार हे निश्चित झाले आहे.
समृद्धीचा प्रावस - २०१९मध्ये सत्तांतर झाल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर समृद्धीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे नवीन नाव देण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महामार्गासाठी जमीन खरेदीची प्रक्रिया डिसेंबर २०१४ मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर डिसेंबर २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन देखील झाले.
मेट्रोचे उद्घाटन रखडले - समृद्धी महामार्ग उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल हे स्पष्ट झाले आहे. मात्र, मोदींनी उद्घाटनासाठी तारीख दिली नाही त्यामुळे उद्घाटन रखडले आहे. त्याचसोबत नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन देखील रखडले आहे. मेट्रोचे काम पूर्ण होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला असताना केवळ उदघाटनाच्या प्रतीक्षेमुळे मेट्रोची चाके थांबली आहेत. त्यामुळे सीताबर्डी ते पारडी मार्गावरील प्रवासी मेट्रोची सेवा सुरू होण्याची वाट बघत आहेत.