नागपूर - जिल्ह्यातील खापरखेडा भागात वाळूच्या अवैध उत्खननावरून एकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंगेश कवडू बागडे, असे मृतकाचे नाव आहे. ही घटना एखाद्या चित्रपटाला शोभणारी आहे.
मंगेश हा सुरादेवी मार्गावर दुचाकीवरून जात होता. त्यावेळी एका जीपमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला धडक दिली. यात तो दुचाकीसह पडला, यावेळी हल्लेखोरांची जीप रस्त्याखाली उतरल्याने अडकली होती. पडलेला मंगेश जीव वाचविण्यासाठी सुरादेवी मार्गाने पळू लागला. यावेळी हल्लेखोरांनीही त्याचा पाठलाग सुरू केला आणि त्याला गाठून दगडाने त्याचे डोके ठेचले. यात तो मरण पावला. यातील आरोपींचा शोध पोलिस घेत असून घटनास्थळावरी दगड, जीप, बनावट पिस्तूल व दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
चार महिन्यांपूर्वी मंगेश जामिनावर आला होता तुरुंगाबाहेर
मृत मंगेशने दीड वर्षांपूर्वी वाळू तस्कर राजेश पेंदाने याला कन्हान नदी पुलावर गोळी मारून खून करण्याचा प्रयत्न केला होता. यात राजेश वाचला होता. खूनाचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी मंगेशला अटक केली होती. मात्र, चार महिन्यांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता.
हेही वाचा - सावनेर-पांढुर्णा मार्गावर चारचाकी उलटून दोघांचा मृत्यू, ७ जखमी
राजेश आणि मंगेशमध्ये होता वाद
राजेश पेंदाने व मृत मंगेश बागडे यांच्यामध्ये वाळूच्या अवैध उत्खननाचा वाद होता. शिवाय दोघांमध्ये हप्त्याचाही वाद होता. यामुळे दोन्ही गटात वाद होत होते.