नागपूर - रस्त्यावरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने नागपूर पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. बेजबाबदारपणे फिरताना आढळणाऱ्या लोकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने पोलिसांनी शहरात पाच ठिकाणी असलेल्या नाकेबंदी पॉईंटवर कोविड चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या चाचणीचा अहवाल लगेच प्राप्त होत असल्याने पॉझिटीव्ह आलेल्या नागरिकांची थेट रवानगी विलगीकरण केंद्रात केली जात आहे. पोलिसांच्या या बेधकड कारवाईमुळे रस्त्यावर भटकणाऱ्या लोकांवर आळा बसेल ज्यातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत मिळणार आहेत.
शहरात ६० ठिकाणी नाकेबंदी -
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून 'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंधांसह ताळेबंदी लागू केली. सध्या कोरोना संसर्गाचा बाबतीत सर्वात भीषण अश्या परिस्थितीत अडकलेल्या नागपूरमध्ये दोन दिवसांपासून लॉकडाऊनचा प्रभाव दिसत असला, तरी बेजबाबदारपणे रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या लोकांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने नागपूर शहरात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या निर्देशानुसार शहरात ६० ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. नाकेबंदी दरम्यान अडवण्यात आलेल्या नागरिकांना घरा बाहेर पडण्यामागील करण विचारण्यात येत आहे. ज्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले, त्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात येते. मात्र, ज्यांना उत्तर देता आले नाही, त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शहरत पाच ठिकाणी अश्या प्रकारचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. गरज भासल्यास हे केंद्र वाढवण्याची तयारी असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
बेजबाबदारांना रोखण्यासाठी कोविड चाचणीची शक्कल -
तब्बल दोन दिवसांपासून नागपूर पोलिसांनी रस्त्यांवर बेजबाबदारपणे फिरणाऱ्या नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कधी कारवाईचा धाक दाखवून, तर कधी समुपदेशन करून नागरिकांना घरीच थांबावे, अशी विनंती नागपूर पोलिसांनी नागरिकांना केली. मात्र, बेजबाबदार नागरिक ऐकण्यापलीकडे गेले असल्याने कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढलेला आहे. तो रोखण्यासाठी पोलिसांनी आता थेट कोविड चाचणीची शक्कल लढवली आहे. कोरोना चाचणीच्या धाकाने तरी बेजबाबदार नागरिक घरी थांबतील, असा विश्वास पोलिसांना आहे.
हेही वाचा - कच्चा माल द्या, सीरमच्या पूनावालांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना साकडे