नागपूर- 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिलतेबाबत निर्देश निर्गमित केले आहेत. या दिशा निर्देशानुसार नागपूर शहरातील जीवनावश्यक सेवा व्यक्तिरिक्त दुकाने व बाजर सम-विषय तत्वावर सुरू करण्यात आली आहेत. तसेच दुकाने सुरू ठेवण्याकरीता वेळ ही निश्चित करण्यात आली आहे. मात्र बहुतांश दुकानदारांकडूनच नियमांना तिलांजली दिली जात असल्याचे निदर्शनात आले त्यानंतर आता नागपूर महानगर पालिकेकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दुकानात आणि मार्केटमध्ये येत असलेल्या प्रत्येक नागरिकांनी त्रिस्तरीय फेस मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु महानगरपालिकेने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे गांभीर्याने पालन होत नसल्याचे निर्दशनास येत असल्याने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पहिल्यावेळी निर्देशाचे उल्लंघन करताना आढळल्यास पाच हजार रुपायांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर दुसऱ्यावेळी निर्दशनास आल्यास आठ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतर तिसऱ्यावेळी नियमांचे उल्लंघन केल्यास दहा हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. त्याच बरोबर उपरोक्त नमूद दंडात्मक तरतूदी व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार सर्व संबंधित हे फौजदारी गुन्हा दाखल करणे, तसेच परवाना रद्द करणे, दुकान बंद करणे या सारखी कारवाई केली जाणार आहे.