नागपूर - कोविडसंदर्भात आयसीएमआरच्या दिशानिर्देशाचे उल्लंघन केल्याने शहरातील धृव पॅथॉलॉजी, सुविश्वास लॅब आणि धंतोली येथील मेट्रो लॅब यांना नागपूर महानगरपालिकेद्वारे नोटीस बजावण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणीमध्ये तफावत, चाचणीची रियल टाइम नोंद नसणे, याशिवाय बरेच अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित असल्याची बाब लक्षात येताच, मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन यांनी ही कारवाई केली.
कोरोनाची चाचणी करण्यासाठी शहारातील विविध लॅबला महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. शिवाय या लॅबना काही बंधने सुद्धा आखून देण्यात आली आहेत. शासनाच्या दिशानिर्देशांनुसारच कार्य करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र नागपुरातील काही लॅबकडून या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले. शहरातील कोविड चाचणीची परवानगी देण्यात आलेल्या पॅथॉलॉजी लॅबची मनपाव्दारे पाहणी करण्यात आली.
यामध्ये रामदासपेठ येथील धृव पॅथॉलॉजी, सुविश्वास लॅब आणि धंतोली येथील मेट्रो लॅबमध्ये आयसीएमआरच्या दिशानिर्देशानुसार एकूण चाचण्या व त्यानुसार करावयाच्या ऑनलाइन नोंदी यामध्ये तफावत आढळून आली. शिवाय लॅबमध्ये होणाऱ्या कोविड चाचणीची रियल टाइम नोंद होणे आवश्यक असताना लॅबमध्ये नोंद न करता, अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित ठेवल्याचे मनपा पथकाला निर्देशनास आले. त्यानुसारच मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार नोटीस बजावण्यात आली.
या प्रकरणी तीनही प्रयोगशाळांच्या व्यवस्थापनाला लेखी स्पष्टीकरण लवकरच सादर करावे लागणार आहे. शिवाय संबंधित लॅबच्या प्रमुखांना लॅबला मिळालेल्या परवानगीपासूनचा संपूर्ण दैनिक अहवाल मनपाला सादर करावा लागणार आहे. आजपर्यंत झालेल्या चाचण्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह तसेच आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या चाचण्या यांची माहिती देखील मनपाला द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर आरटीपीसीआर चाचणी करताना आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात आल्याचा संपूर्ण लेखाजोखा व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीकरिता उपस्थित राहण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन यांच्याकडून देण्यात आले आहेत.