नागपूर - देशात सव्वाशे कोटी जनता आहे. तेवढीच झाडे महामार्गांच्या बाजूला लावणार आहे. शिवाय देशातील सर्वात मोठी समस्या असलेल्या रोजगार निर्मितीवरही भर देणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. खातेवाटपानंतर शनिवारी गडकरी नागपुरात आले. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितीन गडकरी यांनी दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच शुक्रवारी सर्वांना खातेवाटप करण्यात आले. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भूपृष्ठ, रस्ते वाहतूक, जहाज मंत्रालय, तथा सूक्ष्म व लघू उद्योगमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर गडकरी लगेच कामाला लागलेले आहेत. त्यांनी आज येत्या काळात करण्यात येणाऱ्या कामाबद्दल माहिती दिली. मिळालेली सर्व खाते चांगली आहेत. त्यामध्ये सूक्ष्म व लघू उद्योगमंत्रीपदाची सर्वात चांगले असून रोजगारासाठी प्रयत्न करणार असल्याचे गडकरी म्हणाले.
या सत्रात जलसंधारण खात्याची जबाबदारी नाही. मात्र, सहकारी मंत्र्यांच्या मदतीने जलसंधारणाचे कामे करून घेणार आहे. राज्यात १७० पूल तसेच बंधारे बांधणार आहे. शिवाय राज्यात पाणीसाठी वाढवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले. महाराष्ट्रात बळीराजामधून १०८ प्रकल्प, तर प्रधानंत्री सिंचन योजनेतून २६ प्रकल्प उभारणार असल्याचे ते म्हणाले.
गंगा शुद्धीकरणासाठी सर्व टेंडर काढलेले आहेत. त्यानुसार कामेही सुरू झालेली आहेत. मात्र, आता नवीन मंत्र्यांना ती कामे पुढे न्यायची असल्याचे गडकरी म्हणाले.