नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (मंगळवारी) विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री, नागपूर आणि अमरावतीचे विभागीय आयुक्त, या सहा विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यामातून बैठक घेतली. ऑक्सिजनअभावी कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट सुरू करणे आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आणि व्हेंटिलेटर जिल्हानिहाय वितरित करण्यासंदर्भात चर्चा केली. वर्धा येथे पुढील एक आठवड्यात तयार होत असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन सर्व जिल्ह्यांमध्ये वितरीत करण्याच्या संदर्भातसुध्दा आजच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीसाठी नितीन राऊत, एकनाथ शिंदे, नवाब मलिक, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकुर, शंभुराजे देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कोरोनाची आजची स्थिती आणि भविष्यात स्थिती आणखी बिकट झाल्यास करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, दोन्ही विभागांचे आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
रेमडेसिवीरची मागणी आणि पुरवठाबाबत चर्चा
दुसर्या लाटेचे परिणाम गंभीर असताना गडचिरोलीसह विदर्भातील दुर्गम भागात तसेच सर्वच जिल्ह्यांत सुद्धा आरोग्य यंत्रणा सक्षम असली पाहिजे. भविष्यातील ऑक्सिजनची गरज भागली पाहिजे आणि त्यासाठी पीएसए ऑक्सिजन प्रकल्पांचे तातडीने कार्यान्वित केले पाहिजे हा मुद्दा आजच्या बैठकीचा मुख्य विषय होता. संकट वाढले तर अतिरिक्त मागणी लक्षात घेऊन विदर्भात लागणारा एकूण ऑक्सिजन, त्यादृष्टीने पीएसए प्लांटचे रूग्णालयनिहाय कार्यान्वयन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी आणि त्याचे नियोजन तसेच रेमडेसिवीरची मागणी आणि पुरवठा इत्यादींबाबत या बैठकीत सखोल चर्चा झाली.
'पीएसए प्लांटची मागणी तत्काळ नोंदवा'
भविष्यातील गरज लक्षात घेता पीएसए प्लांटची मागणी तत्काळ नोंदविली पाहिजे. यासाठीची प्रक्रिया कोणत्याही प्रकारच्या शासकीय नियमात अडकू नये, असे नियोजन तत्काळ करण्यात यावे, तसेच काही सिलेंडर्स ऑक्सिजनच्या वापरासाठी कन्व्हर्ट करण्याचे काम आपातकालिन स्थितीत तातडीने केले पाहिजे, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.