नागपूर - महाविकास आघाडी सरकारने नागपूरच्या हिंगणा मतदारसंघाला काहीच विकास निधी दिला नाही. अनुभवाने सांगतो ते पुढेही देणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामावर टीका केली. पण असे असले तरी आमदार समीर मेघे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असेपर्यंत चिंता करण्याची गरज नाही. ते नागपूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही फडणवीस म्हणाले. नागपूर-अमरावती महामार्गावरील वाडी येथील उड्डाणपुलाच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार कृपाल तुमानेंना चिमटा -
महाविकास आघाडी सरकारवरील फडणवीसांच्या हल्लाबोल नंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या भाषणार खास शैलीत समाचार घेतला. मंचावर बसलेले शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांना उद्देशून जोरदार टोला हाणला. कृपाल तुमाने हे महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे खासदार असले तरी ते विकासकामांबद्दल माझ्यावरच अवलंबित आहेत. त्यांच्या अधिकाराचा मी आहे, म्हणत शिवसेनेच्या खासदारांच्या कामांसाठीही महाविकास आघाडीकडून पैसा मिळत नसल्याचा टोला हाणला. तसेच शहरासोबतच जिल्ह्याचाही विकास होत असल्याचे ते म्हणाले
'बावनकुळे साहेब पूल एकदा तुमच्या घरातच उतरून देतो...'
दरम्यान याच कार्यक्रमात गडकरी यांनी बावनकुळे यांचीही जोरदार फिरकी घेतली. बावनकुळे नेहमीच सर्व विकास कामे त्यांच्या कामठी मतदार संघात खेचून नेण्यासाठी प्रयत्नरत असतात. आधीच कोट्यवधींची काम करून कामठीचा कायापालट करत ताजमहाल बनवल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले. पण तरीही प्रत्येक काम महत्वाचे आहे म्हणत अधिक निधी मिळवण्याचा बावनकुळे यांचा सूर असतो. त्यामुळे आता तर एक उड्डाणपूल थेट त्यांच्या घरातच उतरून द्यावा लागेल अशी स्थिती असल्याचे म्हणत गडकरी यांनी फिरकी घेतली. त्याच कार्यक्रमात फडणवीस आणि गडकरी यांनी बोलतांना महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला. पण गडकरी यांच्या खास भाषण शैलीने चंद्रशेखर बावनकुळे जखमी तर झाले नाही ना असाच हशा पिकला.