नागपूर - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळाने नागपूर जिल्ह्यातील सलून दुकाने पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलून दुकानात दाढी, कटिंग बनवण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. लोक एकत्रित बसतात, त्या वेळी संक्रमण होऊ नये म्हणून असे एकत्रीकरण टाळण्यासाठी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून दाढी आणि केस कापायला सलूनमध्ये जाऊ नका, कारण तिथे कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. सलूनमधील टॉवेल कित्येक लोक वापरतात, त्यामुळे पुढील महिनाभर सलूनमध्ये जाऊ नका, असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या पार्श्वभूमीवर नाभिक महामंडळकडून पुढील तीन दिवस सलून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.