नागपूर : उपराजधानी नागपुरात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येचा उद्रेक झाला आहे. आज (मंगळवारी) दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ९७७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे १० हजार रुग्णसंख्येचा टप्पादेखील पार झालेला आहे.
नागपुरात पहिला रुग्ण हा ११ मार्चरोजी आढळला होता. त्यानंतर बरोबर ५ महिन्यात रुग्ण संख्येने दहा हजारांचा टप्पा गाठला आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या महिन्याच्या ११ तारखेला नागपुरात २हजार २३४ रुग्ण संख्या होती. मात्र, पुढील महिना भरातच नागपुरात कोरोना आउट ऑफ कंट्रोल झाला आणि अवघ्या तीस दिवसात नागपुरात ८ हजार १२७ रुग्णांची संख्या वाढल्याने आज नागपुरातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या तब्बल १० हजार ३६१ इतकी झाली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या ९७७ रुग्णांपैकी ६२२ रुग्ण नागपूर शहरातील आहेत. तर, उर्वरित ३१५ रुग्ण जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील आहेत. एवढंच नाही तर आज दिवसभरात ३८ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. एकाच दिवसात नऊशे पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नागपुरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने पाचशेच्या टप्पा ओलांडत असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र, आज तब्बल ९७७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १० हजार ३६१ इतकी झाली आहे. यामध्ये १२९ रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. तर, एकूण रुग्ण संख्येपैकी ३ हजार १६५ रुग्ण नागपूर ग्रामीणच्या विविध तालुक्यातील आहेत. तर, ७ हजार १९६ रुग्ण नागपूर शहरातील आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या ९७७ रुग्णांपैकी ३१५ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत. तर, ६६२ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. आज १४६ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागपुरात ५ हजार १५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याशिवाय आज ३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे कोरोनामुळे नागपूरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा एकूण आकडा ३७२ इतका झाला आहे. महत्वाचे म्हणजे ३७२ पैकी ३२० मृत्यू हे जिल्ह्यातील आहेत. तर, ५२ मृत्यू हे जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत. यामध्ये अमरावती आणि अकोला येथील कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. सध्या नागपुरातील २८ ठिकाणी ४ हजार ९३४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ४८.४० टक्के इतके आहे. तर, एकूण मृत्यू दर हा ३.५९ इतका आहे. शिवाय मूळ नागपुरातील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची टक्केवारी ३.०८ इतकी आहे.