नागपूर : शिक्षण कोणत्याही देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावते, हीच बाब महत्त्वाची मानत नवे शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन बदल करण्याची लवचिकता त्यात आहे. या धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे सूत्र समाविष्ट करतानाच देशाला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून देण्याची दूरदृष्टी आहे. बऱ्याच राज्यांनी या धोरणाचा स्वीकार केला आहे. देशातील उद्योजकांनीही आपल्या विद्यापीठांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन म्हणजे राष्ट्रवाद : देशाच्या सर्व गरजा भागविण्यासाठी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन आर्थिक राष्ट्रवाद जपण्याचा आणि नैसर्गिक संसाधनांचा काटेकोरपणे वापर करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. उद्योगासाठी देशांमध्ये स्थानिक पातळीवर कच्चामाल तयार झाला पाहिजे. त्यासाठी स्थानिक उद्योजकांनी पुढे यावे तसेच नागरिकांनीही स्थानिक मालाला प्रोत्साहन दयावे, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेर विचार करावा : नागपूर विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासाची नोंद घेताना त्यांनी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून राष्ट्रविकासात योगदान देण्याचे आवाहन धनखड यांनी केले. विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेर विचार करून स्टार्टस अप, युनिकॉन उभारावेत. अलीकडच्या काळात भारताने प्रगतीचे नवे टप्पे गाठले आहे. 2022 मध्ये जागतिक स्तरावर झालेल्या डिजिटल आर्थिक व्यवहारात भारताचा हिस्सा हा तब्बल ४६ टक्के इतका मोठा होता. याच वर्षी डेटा वापरात भारताचे प्रतिव्यक्ती सरासरी प्रमाण हे अमेरिका आणि चीनच्या एकत्रित वापरापेक्षाही जास्त होते.
तेव्हा भारताची अर्थव्यवस्था पहिल्या स्थानावर असेल : 2022 मध्ये भारत जगातील पाचवी आर्थिक महासत्ता झाला असून या दशकाच्या अखेर आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल. तर स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षी म्हणजेच 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या स्थानावर असेल, असा विश्वासही उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दाखला देऊन उपराष्ट्रपतींनी भाषणाचा समारोप केला.
विद्यापीठाची गौरवशाली परंपरा जपा : गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या विविध ज्ञान शाखांच्या माध्यमातून ओळख निर्माण करणाऱ्या नागपूर विद्यापीठाने भविष्यातही ही उज्ज्वल परंपरा कायम राखावी, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे. यापूर्वी रोजगाराच्या संधी फारच मर्यादित होत्या. आता समाजात घडत असलेल्या परिवर्तनामुळे सरकारी क्षेत्रातील रोजगार कमी होऊन खासगी क्षेत्रातील संधी वाढत आहेत; मात्र त्यासोबतच पदोपदी स्वत:ला सिध्द करण्याचे आवाहनही निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे तयार झालेल्या नव्या शैक्षणिक धोरणामुळे उद्यमशील समाजासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होणार आहे. जगातील सर्वाधिक तरुण देश असणाऱ्या भारताकडे जगाचे कार्यस्थळ होण्याची क्षमता आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी युवकांनी निर्धाराने प्रयत्न करावेत. पूर्वी जगभरातून विद्यार्थी अध्ययन करण्यासाठी भारताकडे धाव घेत असत. देशातील विद्यापीठांनी हा वारसा पुढे नेताना अधिकाधिक शिक्षक तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही राज्यपालांनी केले.
विदर्भाच्या विकासात विद्यापीठाचे महत्वाचे योगदान : विदर्भाच्या सामाजिक व आर्थिक विकासामध्ये नागपूरसह या भागातील पाचही विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात नागपूर विद्यापीठाने केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे औषधनिर्माण शास्त्रासह माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला देश-विदेशात या विद्यापीठाला विशेष ओळख मिळाली आहे. विदर्भाचा सर्वांगिण विकास आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या विद्यापीठाने सदैव पुढाकार घेतल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. नागपुरातील मिहानसारखा प्रकल्प येथील युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा ठरत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहे. या प्रकल्पामध्ये नागपूर विद्यापीठाच्या सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण होईल, एवढी क्षमता आहे. माहिती तंत्रज्ञान तसेच हवाई दळणवळण क्षेत्रातील अनेक प्रकल्प येथे येत आहेत. या उद्योगांना आवश्यक असलेले तज्ज्ञ आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण होईल या दृष्टीने विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार करावेत, अशी सूचना गडकरींनी यावेळी केली.