नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर नागपुरात आयोजित केले आहे. आजपासून २ दिवस हे चिंतन शिबीर होणार आहे. यासाठी पक्षाचे नेते अजित पवार नागपूरमध्ये पोचले आहेत. त्यांनी विमानतळावरच पत्रकारांशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी या शिबिराच्या संदर्भात काही मुद्दे स्पष्ट केले. तसेच सर्वच महत्वाच्या विषयांवर सांगोपांग चर्चा होईल अशी माहिती दिली.
मराठा ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रवादी अनुकूल - अजित पवार म्हणाले की नागपूरात राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर होत आहे. आजपासून २ दिवस हे चिंतन शिबीर होईल. त्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करतील. तसेच कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याची माहितीही पवार यांनी दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरही या चिंतन शिबिरात चर्चा होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही कोर्टात गेलो होतो. वंचित समाजाला योग्य आरक्षण मिळाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी पक्ष जे काही करावे लागेल त्यासाठी तयार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
नेत्यांनी तारतम्य बाळगून वागावे - हल्ली नेत्यांच्या भावनांचा बांध फुटत आहे, त्यावरही अजित पवार यांनी यावेळी भाष्य केले. नेत्यांनी माध्यमांच्यासमोर बोलताना आणि वागताना तारतम्य बाळगून वागले पाहिजे असे ते म्हणाले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी थुंकल्याचा संदर्भ देऊन पत्रकारांनी पवार यांना छेडले असता ते प्रश्नाला उत्तर देत होते. भावनांचा अतिरेक हल्ली होत आहे. त्याला आवर घालणे सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
खडसे मुंडे भेटीचे राजकारण करू नये - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. याबाबत पत्रकारांनी छेडले असता, मुंडे आणि खडसेंचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध आहेत. हे संबंध खूप जुने आहेत. त्यामुळे त्यांनी एकमेकांची भेट घेण्यात काही गैर आहे असे मानण्याचे कारण नाही. त्यावरुन उगीच कुणी राजकारण करु नये. ते योग्य नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मविआ जागा अदलाबदलीची चर्चा नाही - निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. त्यामुळे महा विकास आघाडीच्या जागांच्या अदलाबदलीवर काही बातम्या येत आहेत. त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता याबाबतची कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती पवार यांनी दिली. जेव्हा यााबबत चर्चा होईल त्यावेळी आपणच त्याची माहिती देऊ असा टोला पवार यांनी लगावला.