नागपूर - गेल्या महिनाभरापासून बेपत्ता झालेल्या पंकज गिरमकर या 32 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पंकजची हत्या करणाऱ्या आरोपींनी मृतदेह त्याच्या दुचाकीसह एका ढाब्या शेजारी पुरला होता. सुरवातीला पंकज हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र हे प्रकरण हरवल्याचे नसून, आणखी मोठे असल्याचा संशय पोलिसांना आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. व हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा - पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला; हल्लेखोर तरुणींचा थरार कॅमेऱ्यात कैद
पंकजच्या हत्येमागे अनैतिक संबंध कारणीभूत असल्याचे बोलले जात असले तरी पोलिसांनी याला अद्याप दुजोरा दिला नाही. हा तरुण वर्धा शहरात राहत होता. तो नागपूर-भंडारा मार्गावरील कापसी येथील हल्दीराम फूड कंपनीच्या टेक्निशियन या पदावर कार्यरत होता. त्यामुळे तो पत्नी आणि मुलांसह कापसी परिसरातच खोली करुन राह होता. मात्र, गेल्या महिन्यात तो पुन्हा वर्धेला राहायला गेला होता. पंकज 29 डिसेंबर रोजी घरुन गेला व त्यानंतर तो घरी परतलाच नाही. दोन दिवस पंकजसोबत संपर्क होऊ न शकल्याने त्याच्या बहिणीने नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी पंकजच्या शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याचवेळी पंकजच्या नातेवाईकांनी काही संशयितांचे नाव पोलिसांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला असता काही धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी कापसी येथील एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. आरोपीने पोलिसांना माहिती दिली की पंकजचा मृतदेह त्यांनी कापसी येथील ए. जे. जोगिंदर सिंग ढाब्याच्या शेजारील 12 फूट खोल खड्ड्यात पुरला आहे. एवढच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी पंकजची मोटारसायकल सुद्धा त्या खड्यात पुरली होती. त्यानुसार पोलिसांनी पंकजचा मृतदेह आणि दुचाकी बाहेर काढली आहे. अनैतिक संबंधातून पंकजची हत्या झाल्याचा संशय असल्याने पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - जामखेडची शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, २१ लाखांचा गंडा