नागपूर - नागपुरात निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत 16 ओबीसी उमेदवाराचे पद रिक्त झाले आहे. यासोबत 31 गण म्हणजेच पंचायत समिती सदस्याचे पद रिक्त झाले आहे. यातच राज्य सरकार निवडणूक पुढे धकलण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेल्याने निकालाची प्रतीक्षा आहे. काल (मंगळव) नामांकन भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज उमेदवारांकडून दाखल करण्यात आला नाही. पण राजकीय मंडळीनी मात्र समीकरण जुळवायला सुरुवात केली आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसची सत्ता आहे. यात रद्द झालेल्या सदस्यांमध्ये 7 उमेदवार कॉंग्रेस पक्षाचे तर राष्ट्रवादीचे 4 जागा, भाजपच्या 4 जागा आहे. तर एक जागा शेकापची आहे. यात मात्र ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेल्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार नाही. पण यात 58 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचा एकच उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेला आहे. यात महाविकास आघाडी तिन्ही पक्ष लढल्यास यामध्ये शिवसेनाला वाटा मिळणार का याकडे लक्ष लागले आहे.
सेनेसाठी पक्षवाढीची संधी -
काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांच्या मिळून 11 रद्द झालेल्या जागेवर उमेदवार लढतील. पण याबरोबर उर्वरित पाच जागेवर उमेदवार दिले जातील. सोबतच भाजपनेही निवडणूक पुढे न ढकल्यास 16 ही जागेवर ओबीसी प्रवर्गाचे उमदेवार लढवणार अशी घोषणा केली आहे. यामुळे या जागेसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. यात मागील वेळी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभा तिकीट नाकारल्याने तसेच राज्यातील सत्ताबदलचा फटका बसल्याने भाजपाला 15 केवळ जिंकता आल्या. आता मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकत 16 पैकी अधिकाधिक जागा काबीज करण्याकडे भाजपाचे लक्ष लागले आहे. यात पूर्वी भाजपासोबत असताना शिवसेनेचेही 7 ते 8 उमेदवार निवडणून यायचे. आता मात्र मुख्यमंत्री सेनेचे असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी सक्रिय असून या 16 पैकी काही जागा सेनेला देणार का, यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. पण अद्याप ठोस निर्णय झाला नाही. शिवसेनेला पक्षवाढीसाठी एक चांगली संधी असणार आहे.
स्वबळाच्या घोषणेला फाटा -
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मागील काही दिवसांपासून स्वबळावर निवडणुका लढण्याचे अनेकदा बोलून गेले आहे. पण सध्या नागपूर जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत हाताला घड्याळ बांधून निवडणूक लढण्याचे समीकरण ठरले आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकीत ज्या जागेवर पक्षाचे उमेदवार दिले होते तेच समीकरण सूत्र कायम ठेवले असल्याने राष्ट्रवादीची काही प्रमाणात असलेली नाराजी दूर झाली आहे. यामुळे स्वबळाच्या प्रदेशाध्यक्षाचा घोषणेला सध्या तरी फाटा दिला गेल्याचीच चर्चा रंगू लागली आहे.
जिल्हा परिषदेत संख्याबळ -
नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता असून मंत्री सुनील केदार यांच्या गटाचे वर्चस्व आहे. काँग्रेसकडे 30 जागेचे संख्याबळ आहे. यात राष्ट्रवादीकडे 10 जागा, भाजपकडे 15, शिवसेनेकडे केवळ 1 जागा, तर शेकापला 1 जागा असे संख्याबळ आहे. आता मात्र निवडणूक झाल्यास फायदा ज्या पक्षाचा जागा वाढतील त्यालाच होणार आहे. पण निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही. मॅजिक फिगर 30 असल्याने सत्ता टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसला महाविकास आघाडी असल्यास फारसे कठीण जाणार नाही. हेच चित्र सध्या दिसून येत आहे.
...असा आहे निवडणूक कार्यक्रम -
29 जुलैपासून अर्ज भरले जाणार आहे. 6 जुलैला छाननी करून वैध ठलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 12 जुलैला चिन्ह वाटप, 19 ला मतदान आणि 20 जुलैला मतमोजणी होणार आहे. यात पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.
कोरोनाच्या निर्बंधामुळे प्रचाराला फटका -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या प्रचारात अडचण येणार आहे. प्रचाराचा कालावधी कमी असल्याने अडचण निर्माण होणार आहे. यात दिवसभर जमावबंदी आणि दुपारी चारनंतर संचारबंदी अशा अडचणीतून आदर्श आचारसंहिता सांभाळत प्रचार, मोर्चा शांततेने चालवण्यासाठी राजकीय मंडळींना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.