नागपूर - बेशिस्तपणे वाहन चालवताय, सावधान..! आता बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. नागपूर पोलिसांनी ट्रॅफिक स्कॉड पथकाची स्थापना केली आहे. याअंतर्गत साध्या वेशातील वाहतूक पोलीस कर्मचारी नियम मोडून इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणार आहेत. त्यामुळे आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना हजारो रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
साध्या वर्दीत असलेले वाहतूक पोलीस तुम्हाला पकडणार आणि दंडही करणार आहेत. तुम्ही पळालाच तर तुमच्या घरीसुद्धा पोलीस पोहोचणार आहेत. त्यामुळे नागपूरकरांना वाहतुकीचे नियम मोडण्याआधी दहादा विचार करावा लागणार आहे.
बेशिस्तांवर कारवाई करताना वाहतूक पोलीस नागपूर वाहतूक विभागाने नियमांचे आणि खास करून सिग्नल जम्पिंग करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी हे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात आठ ते दहा कर्मचारी असतील. चारही झोनसाठी वेगवेगळे चार पथके तयार करण्यात आली आहेत. याला 'ट्रॅफिक क्रॅक टीम' असे नाव देण्यात आले आहे.
साध्या वेशात असणारे हे पोलीस अगदी साधेपणाने सिग्नलसमोर उभे राहणार आहेत. एखाद्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास चालकाला थांबवून त्याच्यावर ऑन दि स्पॉट कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी वाहन चालकाला १२०० रुपयाचे चालान भरावे लागेल. जर एखादा पळून जाण्यात यशस्वी झालाच तर हे पथक संबंधित गाडीचा नंबर सिसिटीव्हीच्या माध्यमातून जाणून घेईल आणि पत्ता शोधून त्याच्या घरी पोहोचेल. हपथक गुन्हे शाखेच्या पथकाप्रमाणे असेल. त्यांच्याकडे तात्काळ चालान करण्याची सुविधासुद्धा असणार आहे. बेशिस्तांना वळण लावण्यासाठी हा जालीम उपाय असला तरी याला किती प्रतिसाद मिळतो हे पाहाणे महत्त्वाचे असणार आहे. तसेच साध्या वेशातील पोलिसांना कारवाई करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात हेसुद्दा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.