नागपूर: नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ३० जानेवारी रोजी विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सहा जिल्ह्यांमध्ये शांततेत मतदान पार पडले होते. सर्व जिल्हयांमध्ये जवळपास ८६.२३ टक्के मतदान झाले आहे. विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी २२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. ३० जानेवारी २०२३ रोजी पार पडलेल्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया चोखपणे पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्ण सज्ज आहे.
मतमोजणी सुरू: अजनी येथील समुदाय भवनात मतपेट्या बंद केलेली स्ट्राँगरुम बंदोबस्तात इनकॅमेरा उघडण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीस सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ.विजयलक्ष्मी बिदरी मतमोजणी केंद्रावर उपस्थित मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक, अधिकारी-कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आदिंना गोपणीयतेची शपथ दिली. स्ट्राँगरुममधून बाहेर काढण्यात आलेल्या मतपेट्यांतील मतपत्रिका मिक्सिंग ड्रममध्ये एकत्र करून प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणीस सुरुवात झाली. यावेळी उमेदवार व प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. सर्वप्रथम अवैध मतांना वेगळे केले जाईल.
रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु राहण्याची शक्यता: या मतदान प्रक्रियेत बॅलेट पेपर वापरण्यात आले आहेत. २२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तसेच पसंतीक्रमानुसार मतमोजणी होत आहे. पसंती क्रमांक असल्यामुळे पहिल्या पसंतीची मते यावर निकालाचे सर्व गणित अवलंबून असल्यामुळे पमतमोजणीची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण होण्यास उशिर होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच रात्री उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरु राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोबाईल प्रतिबंधीत,प्रवेशिकाधारकांनाच प्रवेश: या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या कर्मचारी तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवार या सर्वांना प्रवेशिका देण्यात आली आहे. प्रवेशिकांशिवाय कोणालाही आतमध्ये परवानगी मिळणार नाही. या परिसरात मोबाईल वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंसाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून प्राधिकार पत्र (प्रवेशिका) प्राप्त माध्यम प्रतिनिधींनाच येथे प्रवेश असणार आहे. साध्या ओळखपत्रावर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल, कोणतेही इलेक्ट्रीक उपकरण, कॅमेरा, पेन कॅमेरा घेवून जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.
जिल्हानिहाय झालेले मतदान: गडचिरोली जिल्ह्यात १८ मतदान केंद्रांवर ९१.५३ टक्के मतदान झाले. नागपूर जिल्ह्यामध्ये ४३ मतदान केंद्रांवर ८१.४३ टक्के मतदान झाले. भंडारा जिल्ह्यात १२ मतदान केंद्रांवर ८९.१५ टक्के मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील १० मतदान केंद्रांवर ८७.५८ टक्के मतदान झाले. वर्धा जिल्ह्यात १४ मतदान केंद्रावर ८६.८२ टक्के मतदान झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रांवर ९१ .५३ टक्के मतदान झाले.
३४ हजार ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात एकूण ३९ हजार ४०६ मतदार आहेत. यात २२ हजार ७०४ पुरुष तर १६ हजार ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे. पैकी आज एकूण ३४ हजार ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात २० हजार ६६३ पुरुष तर १३ हजार ६८६ महिला मतदारांचा समावेश आहे.