नागपूर : पोलिसांनी पुन्हा एकदा तृतीयपंथीयांवर निर्बंध (Restrictions On Transgenders) लादले आहेत. यासाठी शहर पोलीस विभागाने कलम 144 सीआरपीसी अंतर्गत अधिसूचनाही जारी केली आहे. शहरातील तृतीयपंथींविरोधातील वाढत्या तक्रारी पाहता पोलीस आयुक्तांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. शहरात जी-20 परिषदेच्या वेळीही कलम 144 सीआरपीसी तृतीयपंथीयांवर निर्बंध लादले होते. हा आदेश 16 ऑगस्ट ते 14 ऑक्टोबर या कालावधीत लागू असेल.
144 CRPC नुसार आदेश: नागपूर शहर पोलिसांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, तृतीयपंथीय गट शहरातील विवाह समारंभ, उत्सव, सामाजिक मेळावे, धार्मिक कार्यक्रम असलेल्या ठिकाणांचा शोध घेतात. त्या ठिकाणी जाऊन ते नागरिकांना जबरदस्तीने पैसे मागतात. पैसे दिले नाहीत तर मारहाण करतात. अशा रोजच घटना घडत आहेत. त्यामुळे हा आदेश लागू करण्यात आल्याचे नागपूर शरहाचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटले आहे.
कार्यक्रम स्थळी जाण्यास मनाई: तृतीयपंथी शुभ कार्य चालू असलेल्या ठिकाणी जाऊन गोंधळ घालतात. त्याशिवाय ते ट्रॅफिक सिग्नलवर देखील नागरिकांना त्रास देतात. काही जण पैसे न दिल्यास अश्लील वर्तन करत असल्याच्या अनेक तक्रारी असल्याने पोलिस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निवासस्थाने, व्यापारी प्रतिष्ठाने, ट्रॅफिक सिग्नल, लग्न समारंभ, सार्वजनिक उत्सव, धार्मिक मेळावे, जन्म समारंभात जाण्यात तृतीय पंथीयांना मनाई करण्यात आली आहे.
तर कारवाईस पात्र राहतील : या संदर्भात नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार मनाई आदेश जारी केला आहे. सदर आदेश 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू राहील. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम 143, 144, 147, 159, 268, 384, 385, 503, 504, 506 IPC तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या कलम 67, 68, 111, 112 नुसार कायदेशीर कारवाईस करण्यात येणार आहे.