नागपूर - वाढदिवशी इतर मुलांच्या शुभेच्छा का स्वीकारल्या, या कारणाने एका तरुणाने अल्पवयीन मैत्रीणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेत मारहाण केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. या कृत्याच्या व्हिडिओ करुन ते इस्टाग्रामवर व्हायरल केल्याने ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. समीर खान (वय 19 वर्षे) आणि मोहम्मद शाकीन सिद्धकी (वय 25 वर्षे), असे अटकेत असलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, समीर खान हा टिकटॉक स्टार असून तो एका कंपनीच्या डीलरशीपचे काम करतो. पीडित अल्पवयीन मुलीसोबत समीर खानची मैत्री होती. ती तिच्या वाढदिनी इतर मुलांकडून शुभेच्छा स्वीकारल्या, असा संशय समीरला आला. त्यामुळे त्याने त्या मुलीस कमाल चौकात बोलावून घेतले. त्यानंतर समीरच्या मित्राच्या दुचाकीवरुन त्याने त्या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका विट भट्टीजवळ नेत त्या ठिकाणी त्या मुलीला मारहाण केली. घटनास्थळावरुन काही महिलांनी त्या मुलीला समीरच्या तावडीतून सोडवले होते.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली दोघांना अटक
या घटनेचा व्हिडिओ समीरने इंस्टाग्रामवर व्हायरल केला होता. या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत पोलिसांनी तपास सुरू केली. त्यानंतर सायबर सेल व गुन्हे शाखेच्या पथकाने मुलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता मुलीने समीरने अनेकवेळा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे तिने सांगितले.
दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी
तिच्या जबाबवरुन पोलिसांनी समीर खान व मोहम्मद शाकीन सिद्धकी या दोघांविरोधात भा.दं.वि.चे कलम 376, 363 सह पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली.
हेही वाचा - आधी फुटबॉल खेळाडू नंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनय केलेला अभिनेता बनला मोबाईल चोर