नागपूर - माजी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबई येथे बदली झाली आहे. बदलीनंतर ते आज नागपूरहून मुंबईला रवाना झाले. यावेळी नागपुरातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी करत त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. नागरिकांनी 'वुई वॉन्ट मुंढे'च्या घोषणाही दिल्या. कोरोनाच्या संकटकाळात नागपूरला मुंढेंची गरज आहे, त्यामुळे त्यांची बदली रद्द करा, अशा भावना समर्थकांनी व्यक्त केल्या.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची मुंबई येथे बदली करण्यात आली. मात्र, काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ते नागपूरच्या त्यांच्या शासकीय निवासस्थानीच थांबले होते. मुंढे नुकतेच कोरोनामुक्त झाले. त्यानंतर ते आज मुंबईसाठी रवाना झाले. यावेळी नागपूरकरांनी एकत्र येत त्यांच्या समर्थनार्थ निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. कोरोनाच्या काळात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली का? असा प्रश्नही नागपूरकरांनी उपस्थित केला. 'नागपूरची सद्यस्थिती पाहता महानगरपालिकेला मुंढे साहेबच हवे,' अशा भावना नागपूरकरांनी बोलून दाखवल्या.
नागपूरातील 'तपस्या' या शासकीय निवासस्थानाबाहेर नागपूरकरांनी मुंढे यांना निरोप देताना त्यांच्या गाडीवर फुलांचा वर्षाव करत 'वुई वॉन्ट मुंढे', 'वुई सपोर्ट मुंढे' अशा आशयाच्या घोषणा दिल्या. यादरम्यान नागपूरकर आणि पोलिसांमध्ये 'तू-तू मैं-मैं' सुद्धा झाल्याचे पहायला मिळाले. तुकाराम मुंढे आयुक्त पदावरून गेल्यानंतर त्यांच्या जागी नवे आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता, ठोस निर्णय घेणारा अधिकारी हवा. त्यामुळे मुंढेंची बदली शासनाने रद्द करावी, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.