नागपूर - गेल्या सहा महिन्यांपासून नागपूर महानगरपालिकेने कंत्राटदारांचे बिलाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे या कंत्राटदारांनी आधी पैसे द्या, अन्यथा काम बंद करू, असा इशारा महानगरपालिकेला दिला आहे. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच शहरातील विकासकामे ठप्प होण्याच्या मार्गावर आली आहेत.
पावसाळ्याच्या तोंडावर नागनदीवरील सुरक्षा भिंत आणि अर्धवट कामे बंद पडली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून मनपाने कंत्राटदारांची बिले थकविली आहेत. मालमत्ता कराचेही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे नागपूर महानगरपालिका आर्थिक संकटात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मनपाने कंत्राटदारांचे साधारण १५० कोटी रुपयांची बिले थकवली आहेत. त्यामुळेच आता थेट कामे सोडण्याचा इशाराच कंत्राटदारांनी दिला आहे. नाले आणि नदीवरील सुरक्षा भिंत बाधण्याचे काम पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. अशा स्थितीत कंत्राटदारांनी कामे बंद केल्यास त्याचा मोठा फटका नागपूरकरांना बसणार आहे. कंत्राटदारांचे त्यांच्या कामाचे त्वरीत पैसे देऊ, असे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले आहे.