नागपूर Sana Khan Murder Case : सना खान हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले आहेत. पोलिसांनी आरोपी अमित साहूच्या जबलपूर येथे राहत असलेल्या आईच्या घरातून एक मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त केलाय. हा मोबाईल आणि लॅपटॉप सनाचा असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) विशेष पथकाने जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळं लवकरच या प्रकरणी काही नव्या घडामोडी घडू शकतात अशी शक्यता निर्माण झालीय.
पॉलिग्राफ टेस्ट आणि लाय डिटेक्टर टेस्ट : नागपूर शहर पोलिसांनी मुख्य आरोपीची पॉलिग्राफ टेस्ट करण्याचं ठरविलं आहे. त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. सना खान काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील जबलपूरला जाऊन बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मित्रानेच त्यांची हत्या केल्याचं समोर आलं होतं. मात्र, आजवर सना खानचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सना खानचा मोबाईल फोनही पोलिसांना मिळालेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसात नागपूर पोलिसांनी याप्रकरणी नव्या दमाने तपास सुरू केल्यानंतर महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
नोव्हेंबरमध्ये केलं आरोपपत्र दाखल : बहुचर्चित नागपूर सना खान हत्या प्रकरणात नागपूर शहर पोलिसांनी मुख्य सूत्रधार अमित उर्फ पप्पू रज्जनलाल साहूआणि इतर पाच आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. दोन ऑगस्टला सना खानची मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे हत्या झाल्याचे अनेक पुरावे नागपूर पोलिसांच्या हाती लागले असले तरी, महिलेचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना अपयश आलं आहे.
आर्थिक वादातून सनाची हत्या : सना खानची हत्या आर्थिक वादातून झाल्याचं पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केलंय. महत्वाचं म्हणजे महिलेचे शेवटचे लोकेशन मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे होते, त्यांची हत्या देखील जबलपूर येथे झाल्याचा संशय आहे.
पोलिसांनी गोळा केले भक्कम साक्ष पुरावे : नागपूर पोलिसांच्या एका पथकाने मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे नागपूर सना खान हत्या प्रकरणात साक्ष पुरावे गोळा करण्याचं काम केलं. या पथकाने आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा केले आहेत. मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये ज्या राहत्या घरी आरोपीने सना खानची हत्या केली होती. त्या ठिकाणी सोफ्याच्या फोममध्ये सुकलेले रक्ताचे डाग पोलिसांना मिळाले होते. ते रक्त महिलेचे असल्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे.
हेही वाचा -