नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार २१ जूनपासून संपूर्ण देशात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप राज्य शासनाचे कुठलेही निर्देश नाहीत. तरीही लसीकरणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका सज्ज झाली आहे. जर निर्देश प्राप्त झाले तर २१ जूनपासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. यादृष्टीने संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.
शासनाचे आदेश मिळताच लसीकरण सुरू
१८ ते ४४ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासंदर्भात एक विशेष बैठक महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पार पडली. यावेळी तिवारी म्हणाले, की '१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उत्साह आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. लसीकरणासाठी सध्या १०४ केंद्र तयार आहेत. सर्व नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा 8 ते 10 केंद्रांची वाढ करण्यात येणार आहे. प्रथम नोंदणी केल्यानंतर स्लॉट आणि केंद्र ज्याप्रकारे मिळेल त्यानुसारच नागरिकांना लसीकरण केंद्रावर जायचे आहे. केंद्रांची संख्या अधिक असल्यामुळे गर्दी होणार नाही, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीनेच हे नियोजन आहे. संपूर्ण तयारी नागपूर महानगरपालिकेने करून ठेवलेली आहे. शासनाचे जसे आदेश येतील तसे लसीकरण सुरू करण्यात येईल'.
'चाचणी आपल्या दारी' उपक्रमाला सुरवात
'भविष्यात कोरोनावर नियंत्रण असावे यासाठी आतापासून प्रत्येक व्यक्तीची चाचणी व्हावी यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने नुकताच 'चाचणी आपल्या दारी' हा उपक्रम सुरू केला आहे. कॉर्पोरेट सेक्टर, बँका, खासगी कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने, ज्या ठिकाणी एकत्र २०च्या वर लोकांची चाचणी करायची आहे. त्या संस्थांनी आपली मागणी मनपाकडे नोंदवावी. मनपाची टीम तेथे जाऊन चाचणी करेल', असेही महापौरांनी म्हटले.
मनपाकडे ३५ ते ४० हजार डोस उपलब्ध
'१८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरणासंदर्भात अद्याप कुठलेही निर्देश नाहीत. परंतु, मनपा प्रशासनाची संपूर्ण तयारी आहे. सध्या मनपाकडे ३५ ते ४० हजार डोस उपलब्ध आहेत. राज्य शासनाच्या निर्देशाशिवाय लसीकरण करणे शक्य होणार नाही. साठा उपलब्ध होताच कुठल्याही क्षणी लसीकरण सुरू करता येईल. गर्दी होणार नाही अशा नियोजनाने 100हून अधिक केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ३०० केंद्रांचे उद्दिष्ट असून लसीकरण सुरू झाल्यानंतर केंद्रे मागणीनुसार वाढविण्यात येतील. तसेच यासाठी जनप्रतिनिधी यांचीसुध्दा मदत घेण्यात येणार आहे', असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत म्हटले.
हेही वाचा - हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते गुलाबराव पाटलांचा गिरीश महाजनांना टोला, म्हणाले...