नागपूर : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. शासनाच्या दिशानिर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करावे या अटीवर दैनंदिन कामकाज सुरू करण्याची सवलत देण्यात आली. नागरिकांना प्रशासनातर्फे वेळोवेळी आवाहन करण्यात आले. मात्र, नागरिक खबरदारीचे नियम पाळत नसल्याचे झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढत्या मृत्यूसंख्येवरून दिसू लागले आहे. त्यामुळे आता नियम तोडणाऱ्यांवर तत्काळ प्रभावाने साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत सरळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक शहरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, नागपुरात लॉकडाऊन करण्याची गरज पडू नये. यासाठी आता नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, या विषयावर नागपुरातील मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात दहाही झोनचे सहायक आयुक्त आणि पोलीस प्रशासनातील अतिरिक्त आयुक्तांसह सर्व झोनचे उपायुक्त यांची संयुक्त बैठक मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू होण्यापूर्वी नागपुरात ४०० च्या जवळपास कोरोना रुग्णसंख्या होती. मात्र, १६ जुलैपर्यंत ती २ हजार ६०० च्या घरात गेली. म्हणजेच दीड महिन्यात २ हजार २०० रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. याचाच अर्थ नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत असूनही ते केले जात नाही.
बाजारात व्यापाऱ्यांना ताकीद देऊनही सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात येत नाही. मास्कचा वापर केला जात नाही. दुकानांसाठी जे नियम आखून दिले आहेत, त्याचेही उल्लंघन होत आहे. नाईट कर्फ्यूची ही गांभीर्यपूर्वक अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी पोलीस विभागास केले होते. त्यामुळे आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापुढे मार्केट परिसरात नियमांचे काटेकोरपणे पालन व्हायलाच हवे, असे म्हणत आजपर्यंत नागरिकांवर प्रशासनाने ही जबाबदारी टाकली होती. आता नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करीत असतील तर त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्याखाली ‘ऑन दि स्पॉट’ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. यासाठी मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आजपासूनच "ॲक्टिव्ह मोड"वर यावे असेही त्यांनी सांगितले. एवढंच नाही तर आता हॉकर्सवर होणार कारवाईदेखील केली जाणार आहे.
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत काढण्यात आलेल्या आदेशात कुठेही शहरात हॉकर्सला परवानगी देण्यात आलेली नाही. मुख्य बाजारात आणि गल्ल्यांमध्येही हॉकर्स बसलेले आहेत. सम-विषम नियमात दुकानांना परवानगी आहे. मात्र, हॉकर्स दिशा बदलवून बसू लागले आहे. ही बाब पोलीस अधिकाऱ्यांनीच लक्षात आणून दिली. अशा शहरातील सर्व हॉकर्सवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिले आहेत. बाजार परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दंड आकारण्यात येत होता. आता ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे. नवा आदेश काढून ही रक्कम वाढवणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी बैठकीत दिली.