नागपूर - लॉकडाऊनच्या काळात अन्न धान्यासाठी कोणीची पायपीट होऊ नये आणि गरजूंना स्वस्त दरात धान्य मिळावे, यासाठी शासनाकडून रेशन दुकानात धान्यसाठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र, काही रेशन दुकानदार धान्य वाटपात प्रचंड भ्रष्टाचार करत आसल्याचे दिसत आहे. अशीच तक्रार नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील आमदार अॅड. आशिष जयस्वाल यांच्याकडे आली. त्यानंतर आमदार महोदयांनी रेशन दुकानांवर धडक मोहीम सुरू केली आहे. आशिष जयस्वाल यांनी परशिवानी तालुक्यात एका रेशन दुकानातील भ्रष्टाचार उघड केला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा... 'अशा' कठीण प्रसंगात तरी भाजप नेत्यांनी जातीयवादाचे राजकारण थांबवावे
परशिवानी तालुक्यातील कांन्द्री ग्रामपंचायतच्या खदान टेकडी या भागातील रेशन दुकानावर आमदार आशिष जयस्वाल यांनी अचानक भेट दिली. तेव्हा दुकानदार प्रत्येकाला 4 ते 8 किलो धान्य कमी देत असल्याचे दिसून आले. हा संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर आमदारांना संताप अनावर झाला. त्यांनी धान्य घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या समोरच त्या रेशन दुकानदाराची शाळा घेतली. तेव्हा अनेकांनी धान्य कमी मिळत असल्याच्या तक्रारीचा पाढा वाचला. आमदार आशिष जयस्वाल यांनी रेशन दुकानांच्या माध्यमातून होणारा काळाबाजार थांबवण्याच्या हेतुने आता रेशन दुकांनदारांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. तसेच सर्व रेशन दुकानदारांना सक्त ताकीद देवून नागरिकांना त्यांच्या अधिकाराबाबत अवगत करून दिले.