नागपूर - महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध सत्ताधारी हा वाद थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. आयुक्तांनी केलेल्या सर्व दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी 4 उपसमितींची नियुक्ती केली असून 25 तारखेला होणाऱ्या सभेत या समितीची सत्यस्थिती पालिकेपुढे आणणार आहेत.
नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्याही 700 पार गेली आहे. अशी परिस्थिती असताना आयुक्त तुकाराम मुंढे खोटी माहिती देऊन नागपूरकरांची दिशाभूल करत असल्याचा थेट आरोप महापौरांनी केला आहे. महानगरपालिकेने उपचारासाठी खासगी रुग्णालयांसोबत करार करून 1 हजार 800 बेड उपलब्ध करून दिल्याचा दावा आयुक्तांनी केला होता. याव्यतिरिक्त राधाकृष्ण मिशनमध्ये 5 हजार बेड असल्याचे देखील सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात फक्त 500 बेडची व्यवस्था पालिकेकडे असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने चौकशी समिती नियुक्त केल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.