नागपूर Nagpur Hospital Death Case : नागपूरमध्ये मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयात मागील तीन दिवसांत तब्बल ६३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दोन्ही रुग्णालयात अति गंभीर रुग्ण येत असल्याने सरासरी रोज १५ ते २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद होतेय. मात्र,असं असतानाच आता खासगी रुग्णालयातून ही अत्यवस्थ रुग्ण मेयो आणि मेडिकलमध्ये येत असल्याने मृत्यूचा आकडा जास्त वाटत असल्याचं मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ राज गजभिये यांनी स्पष्ट केलंय. तसंच रुग्णालयात विदर्भासह, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील गंभीर आजारांचे रुग्ण येत असल्याचंही ते म्हणाले.
मध्यप्रदेश, छत्तीसगडचे सर्वाधिक रुग्ण : स्वस्त आणि योग्य उपचार मिळावा याकरिता विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि काही प्रमाणात आंध्रप्रदेश राज्यातील रुग्ण येतात. याशिवाय खासगी रुग्णालयातील अनेक रुग्णांना उपचारासाठी मेयो, मेडिकलमध्ये पाठविण्यात येतं. त्यामुळे दररोज १४ ते १६ रूग्णांचा मृत्यू होतो, अशी माहिती डॉ गजभिये यांनी प्रसार माध्यमांना दिलीये.
मृत्यूचे आकडे वाढलेले नाहीत : मेडिकलमध्ये रोज सरासरी १४ ते १६ रुग्णांचा मृत्यू होतोय. अचानकपणे मृत्यू होण्याचे आकडे वाढलेले नाहीत. हे मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात असून एकाच ठिकाणी २३०० बेड आहेत. मेडिकल, सुपर स्पेशालिटी, ट्रॉमा केअर आणि इतर युनिट २३०० बेड आणि २०० पेक्षा अधिक रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यापैकी ५० ते ६० रुग्ण अति गंभीर असतात, त्यापैकी काही रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होतो असं देखील ते म्हणाले.
तीन महिने पुरतील एवढे औषध उपलब्ध : हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या औषधांचा स्टॉक उपलब्ध असल्याचं यावेळी डॉ गजभिये म्हणाले. पुढील ३ महिने पुरतील एवढा स्टॉक उपलब्ध असून औषधी खरेदी करण्यासाठी सरकारने डीपीडीसी मधून मेडिकलला १३ कोटी आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला १३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले, असंही यावेळी त्यांनी नमूद केलंय.
हेही वाचा -
- Nagpur Hospital Death : राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, नागपुरात २४ तासात २५ रुग्ण दगावले
- Nanded Hospital Death Case : मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल
- Nanded Hospital Death Case : नवजात बाळासह आता आईनंही सोडला श्वास; नातेवाईकांचा आक्रोश