नागपूर - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर अश्लाघ्य टीका करणारे पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जयदीप कवाडे यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे. नागपूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचार सभेचे बगडगंज येथील कुंभारपुरा येथे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेला काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. या सभेत बोलताना पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केली होती.
जयदीप कवाडे हे विधान परिषदेचे आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र आहेत. ते एवढ्यावरच न थांबता स्मृती इराणी यांच्या डोक्यावरील कुंकवासंदर्भातही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या संदर्भात भाजपच्या महिला नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आज बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी आश्विन मुदगल यांनी लकडगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जयदीप कवाडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.