नागपूर - लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निकलस मंदिराजवळ कुख्यात डॉन संतोष आंबेकर याचा बंगला आहे. हा बंगला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने पाडायला सुरुवात केली आहे. बंगला पाडायला 2 दिवसांचा कालावधी लागणार असल्याने त्याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बंगला पाडण्याची कार्यवाही सुरू होताच आंबेकरच्या वकिलांनी कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांसमोर त्यांचे काहीच चालले नाही. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार महानगरपालिकेने कुख्यात गुंड आंबेकर याचा बंगला पाडण्याची कागदोपत्री औपचारिकता दोन दिवस आधीच पूर्ण केली होती. या कार्यवाहीदरम्यान अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली.
संतोष आंबेकर सध्या विविध गुन्ह्यांतर्गत नागपूर पोलिसांच्या अटकेत आहे. त्याच्या गुन्ह्याचे साम्राज्य उद्धवस्त करण्यासाठी पोलीस विभागाने गेल्या दोन महिन्यांपासून कारवाईचा धडाका लावलेला आहे. याच मालिकेत त्याचा हा बेकायदेशीर बंगला पाडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.