नागपूर - एकदा माझ्या वर्गातील मुलांनी गोंधळ केला. यात माझे नाव पुढे आल्याने मी सलग १५ दिवस शाळेतच गेलो नाही. तेव्हा वडिलांपर्यंत माझी तक्रार गेली. त्यावेळी वडिलांनी माझी चूक कुठे झाली? याची जाणीव करून दिली. त्यावेळी वडिलांनी मला समजून माझ्यातील दोष दाखवले नसते, तर मला कदाचित त्यावेळी चुकीची वळण लागली असती. मात्र, आई वडिलांसह सर्व गुरुजनांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच आज जिल्हाधिकारी म्हणून सक्षमपणे जबाबदारी पार पाडू शकत असल्याचे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.
मी स्वतः ग्रामीण भागातून आलो आहे. त्यामुळे माझे ग्रामीण भागाशी नाते कधीही तुटू दिले नाही. प्रशासकीय सेवेत काम करताना देखील शेती हा माझा आवडीचा विषय आहे. त्यामुळे शासनाच्या कृषी समृद्धी योजनेत काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी कृषी विभागाचे सचिव डॉ. सुधीर कुमार गोयल यांनी एका गुरूप्रमाणे मला मार्गदर्शन केले असल्याचे रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.
'या' दोन शिक्षकांनी जीवनाचे धडे दिले -
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे वडील पोलीस होते. त्यामुळे त्यांची वारंवार बदली व्हायची. त्यामुळे काही कालावधीच्या अंतराने त्यांच्या शाळा देखील बदलत गेल्या. शिक्षणाचा श्रीगणेशा भंडारा जिल्ह्यातील पवनी येथून झाला. त्यानंतर दुसरी ते पाचवी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षण मौदा येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण वर्धेत घेतले. त्यामुळे माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मला वेगवेगळ्या गुरूजनांकडून मार्गदर्शन मिळत गेले, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे सांगतात. शाळेत असताना मराठीचे शिक्षक बोरकर सरांच्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर प्रभाव राहिलेला आहे. त्यानंतर घाडगे सरांकडून प्रत्येक गोष्टीचा तर्क कसा काढायचा आणि त्या गोष्टींचे भविष्यातील फायदे-तोटे कसे ओळखायचे? हे शिकायला मिळाले. त्यांनी मला जीवनाचे धडे दिले, असेही ठाकरे यांनी सांगितले.
गुरू शोधण्यासाठी वनात भटकण्याची गरज नाही -
एखाद्या वयोवृद्धामध्येच गुरू होण्याचे गुण असतात हा समाज चुकीचा आहे. कौशल्यवान आणि विनम्रतेची शिकवण देणारा लहान व्यक्ती सुद्धा कुणाचाही गुरू होऊ शकतो, असे प्रामाणिक मत नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. गुरू शोधण्यासाठी कुठे वनात फिरण्याची गरज नाही, तर ते आपल्या आजूबाजूलाच मिळू शकतात. केवळ आपल्याकडे सकारात्मक दृष्टीकोण हवा, असेही ठाकरे म्हणाले.