नागपूर- जिल्ह्यासोबतच संपूर्ण देश आणि जगावर असलेल्या कोरोनाचे संकट विघ्नहर्ता श्रीगणेश दूर करेल, ही आशा प्रत्येक भाविकाला आहे. मात्र, यंदाचा उत्सव साजरा करताना संयम बाळगणे आणि नियम पाळणे गरजेचे आहे. विसर्जनसमयी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी सर्वच घरगुती गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करावे, असे कळकळीचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाबाबत प्रशासनातर्फे काय तयारी करण्यात आली आहे आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग कसा असेल, याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील एकाही तलावात घरगुती किंवा सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जनाची परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती मंडळांना देण्यात आली आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार यंदाचा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करतानाही काही नियम पाळणे गरजेचे आहे. मूर्ती ४ फुटाच्या वर नसावी आणि सार्वजनिकरीत्या कुठलेही कार्यक्रम होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्यायची आहे. पेंडालवरही नियंत्रण असून यासाठी प्रशासनाचा कस लागणार आहे. प्रशासनाने या सर्व नियमांचे पालन मंडळांकडून होते अथवा नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जोशी यांनी दिले. तसेच, घरगुती गणेशाचे विसर्जन यंदा भाविकांनी घरीच करावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपमहापौर मनीषा कोठे यांनी, मंडळांनी नियम पाळावे आणि गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. स्थायी समितीचे सभापती विजय झलके यांनी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. तत्पूर्वी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी नागपूर महानगरपालिकेने गणेशोत्सवासंदर्भात निर्गमित केलेल्या आदेशाची माहिती दिली. यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनीसुद्धा सूचना मांडल्या. घरगुती गणेश विसर्जनासाठी सोसायट्यांनी गणेश विसर्जनाची यथोचित व्यवस्था सोसायटीमध्ये करावी, अशी सूचनाही काही प्रतिनिधींनी केली.
हेही वाचा- उपद्रव शोध पथकाने कठोरतेसह संवेदनशीलताही दाखवावी, महापौर संदीप जोशी यांचे आदेश